Skip to main content
  1. Kavita/

चांदणे शिंपीत जाशी

चांदणे शिंपीत जाशी चालतां तूं चंचले
ओंजळीं उधळीत मोतीं हासरी ताराफुलें

वाहती आकाशगंगा कीं कटीची मेखला
तेजपुंजाची झळाळी तार पदरा गुंफिलें

गुंतवीले जीव हे मंजीर कीं पायीं तुझ्या
जे तुझ्या तालावरी बोलांवरी नादावले

गे निळावंती कशाला झांकिसी काया तुझी !
पाहुं दे मेघांविण सौंदर्य तुझें मोकळे